नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधावर वाद निर्माण झाल्यानंतर आता बाबा रामदेवांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या 'पुत्रजीवक बीज' औषधाच्या वादावर स्वत: बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या औषधाचा पुत्रप्राप्तीशी कोणताही संबध नाही असं त्यांनी म्हटलंय. हे औषध केवळ अपत्यप्राप्तीसाठी उपयोगी आहे... मुलगाच होईल, असा दावा याद्वारे केला जात नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
खासदार त्यागींच्या आरोपांना उत्तर देताना, 'या औषधामुळे पुत्र प्राप्ती होत नाही... केवळ या औषधाचं नाव 'पुत्रजीवक बीज' आहे. त्यामुळे, त्यागी यांनी लोकांची माफी मागावी' अशी भूमिका बाबा रामदेवांनी घेतलीय.
तसेच या औषधाचा आणि पतंजली संस्थेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काहीही संबध नाही... विरोधक मोदींवर माझ्या माध्यमातून निशान साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
राज्यसभेत अनेक सदस्यांनी योगगुरू रामदेव यांच्या दिव्य फार्मसीद्वार उत्पादित केल्या जाणाऱ्या 'पुत्रजीवक बीज' या औषधावर बंदी आणण्याची मागणी केलीय. हे औषध घेतल्यानं कथित रुपात 'पुत्र प्राप्त करण्यात यश येईल' असा दावा केला जात होता. सरकारनं या मुद्यावर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय.
जदयूच्या के सी त्यागी यांनी सदनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी यावेळी दिव्य फार्मसीद्वारे विकत घेतलेलं एक पाकीटही सदनात सादर केलं. या औषधामुळे 'पुत्र' प्राप्त होईल, असा दावा उप्तादक करत असल्याचं त्यागी यांनी म्हटलंय. मात्र, यावेळी त्यांनी बाबा रामदेव यांच्या नावाचा उल्लेख कटाक्षानं टाळला.
हा लिंग भेदभावाशी जोडलेला मुद्दा असल्याचं खाद्य तसंच जन वितरण मंत्री विलास पासवान यांनी म्हटलंय. तर जया बच्चन यांनी या उत्पादनाला बाजारातून हटवण्याची तसंच या फार्मसीचं लायसन्स रद्द करण्याची मागणी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.