रुपयाचं मूल्यं ठरवणार सोन्याची किंमत?

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात फारच घसरण सुरु होती मात्र सध्या सोने दरात पुन्हा तेजी दिसून येतेय...

Updated: Jul 21, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात फारच घसरण सुरु होती मात्र सध्या सोने दरात पुन्हा तेजी दिसून येतेय. रुपयाच्या किंमतीत होणारा चढ-उतार सोन्याच्या किंमतीवर परिणाम करतोय. रुपयाच्या होत असलेल्या घसरणीमुळे सोने दर तेजीत येतोय. येणाऱ्या काळात रुपयाचा भाव कसा राहतो यावर सोने चांदीचा दर अवलंबून राहील, असं जाणकारांनी म्हटलंय.
रुपया मजबूत झाल्यास सोन्याचा भाव घसरू शकतो तसंच रुपयाचं मूल्यं घसरल्यास सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते, असं कमोडिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आदित्य जैन यांनी सांगितलंय. सोन्याची किंमत आणखी कमी होण्याची ग्राहक प्रतीक्षा करतायत. त्यामुळे सध्या सोने खरेदीचे प्रमाणही कमी झालंय. बाजार तज्ज्ञांच्या मते सध्या मंदीचे राज्य सुरु आहे त्यामुळे सोने चांदी दरात घसरण दिसू शकते.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात तोळ्यामागे ६०० ते ७०० रुपयांनी वाढ दिसून आली होती. एक जुलैला २६,६५० रुपये तोळा असणारं सोनं आता २७,२५० ते २७,४०० रुपयांपर्यत पोहोचलंय. गेल्या तीन महिन्यात सोनं २३ टक्क्यांनी घसरलं. म्युच्युअल फंडानी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतल्यामुळे ही घसरण दिसून आली. परंतु सोन्याच्या बाजारातील कायम राहिलेल्या मागणीमुळे सोन्याची किंमत सध्या तरी स्थिर दिसतेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.