www.24taas.com,नागपूर
शेतजमीन हडपली असं बोलण्यास अंजली दमानियांनी भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप गजानन घाडगेंनी केलाय. या संपूर्ण प्रकरणात राजकरण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्याला केवळ आपल्या जमिनीची मालकी हवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अंजली दमानियांच्या कुणी घाडगेंवर दबाव टाकतंय का ? या प्रश्नावर गजानन घाडगेंनी उत्तर दिलंय. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यातील जी जमीन गडकरींनी बळकावल्याचा आरोप करण्यात येतोय, त्या जमिनीचे मालक गजानन घाडगे आज प्रगटले.
गांधीजयंतीला नव्या पक्षाची स्थापना करून आरोपांच्या फैरी झाडणा-या केजरीवालांना सतरा दिवसांतच स्वतःच्या पक्षात पेस्ट कंट्रोल करण्याची वेळ आलीय. अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी या आपल्याच सहका-यांच्या चौकशीचे आदेश केजरीवालांनी दिलेत. पक्षांतर्गत लोकपाल असलेल्या 3 निवृत्त न्यायाधिशांकडं हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.
अंजली दमानिया यांची कोंडाणे धरण परिसरात 30 एकर जमीन असून भूसंपादनामुळंच दमानिया नितीन गडकरींना टार्गेट करत असल्याचा आरोप होतोय. स्वतःची जमीन वाचवण्यासाठीच केवळ दमानिया कार्यरत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. स्वतःची जमीन न घेता आदिवासींची जमीन घेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
प्रशांत भूषण यांची हिमाचल प्रदेशात जमीन असून शाळेच्या कामासाठी ती घेतली होती. मात्र या सरकारी जागेवर शाळा बांधलीच नसल्याचा आरोप भूषण यांच्यावर आहे. सरकारी जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्या चौकशीचे आदेश केजरीवालांनी दिलेत. तर मयांक गांधींनी बिल्डरच्या हितासाठी एनजीओचा वापर केल्याचा आरोप आहे. मुंबईतल्या पुनर्विकास प्रकल्पात हस्तक्षेप केल्याचा आणि बिल्डर पुतण्याला फायदा मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
पक्षाच्या स्थापनेनंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडणा-या केजरीवालांना आता त्यांच्याच सहका-यांवर होणा-या आरोपांची चौकशी कऱण्याची वेळ आलीय. अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी या तीन सहका-यांच्या चौकशीचं प्रकरण पक्षांतर्गत लोकपालकडं सोपवण्यात येणार आहे.