www.24taas.com, अहमदाबाद
नरोदा पाटिया खटल्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारनं एकेकाळच्या आपल्याच पक्षातील मंत्री राहिलेल्या माया कोडनानी आणि बाबू पटेल ऊर्फ बजरंगी यांच्यासहित १० दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये अहमदाबादच्या विशेष कोर्टानं या खटल्याचा निकाल दिलाय. यामध्ये माया कोडनानाला २८ वर्षांची तर बाबू बजरंगीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
नरोदा पाटियामध्ये २००२ साली घडवून आणलेल्या दंग्यात ९७ जणांच्या मृत्यूसाठी कोडनानीला दोषी ठरवण्यात आलं होतं. कोडनानी आणि बजरंगी यांच्यावर नरोदा गाम दंग्याचाही आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणाचा निकाल येणं अजून बाकी आहे.
गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारनं इतर दोषींच्याही शिक्षेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलंय. यासाठी लवकरच कोर्टानं १४ वर्षांची सजा ठोठवलेल्या २२ दोषी व्यक्तींची शिक्षा वाढवून ३० साल करण्यात यावी, अशी कोर्टाकडे मागणी करणार आहेत. याशिवाय स्पेशल कोर्टानं ज्या २९ जणांना ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ म्हणजेच संशयाचा फायदा देऊन सोडून दिलंय त्यांच्याविरुद्धही पुन्हा अपील करण्यात येणार आहे.
यासाठी गुजरात सरकारला हायकोर्टाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. गुजरात सरकारनं हा पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतल्याचं सरकारच्या वकिलांनी म्हटलंय.