पाकिस्तानला रोखठोक उत्तर देणाऱ्या इनाम गंभीर

सध्या अख्ख्या भारतात एकच चर्चा आहे ती पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा याची आणि त्याचीच रोखठोक सुरुवात केलीय भारताच्या एका हुशार तरुणीनं. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताच्या परराष्ट्र सचिव इनाम गंभीर यांनी पाकिस्तानला असं काही सुनावलं की पाकिस्तानची बोलतीच बंद झाली. 

Updated: Sep 23, 2016, 03:28 PM IST
पाकिस्तानला रोखठोक उत्तर देणाऱ्या इनाम गंभीर title=

मुंबई : सध्या अख्ख्या भारतात एकच चर्चा आहे ती पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा याची आणि त्याचीच रोखठोक सुरुवात केलीय भारताच्या एका हुशार तरुणीनं. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताच्या परराष्ट्र सचिव इनाम गंभीर यांनी पाकिस्तानला असं काही सुनावलं की पाकिस्तानची बोलतीच बंद झाली. 

पाकिस्तानला अद्दल कशी घडवायची.... ?

अगदी गल्लीपासून ते दिल्लीत आणि न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत हीच चर्चा सुरू आहे. या गरमागरम चर्चा सुरू असतानाच पाकिस्तानचा चोख उत्तर देणा-या एका महिलेची चर्चा सुरू झालीय. मीडिया, सोशल मीडियानं तिचं भरभरुन कौतुक केलंय. तिचं नाव आहे इनाम गंभीर. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातली ती फर्स्ट सेक्रेटरी. संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्कमधल्या परिषदेत ऊरी हल्ल्याचा मुद्दा गाजला. पाकिस्तानचे पळपुटे पंतप्रधान नवाज शरीफांनी ऊरी हल्ल्यावर अवाक्षर काढलं नाही पण काश्मीर मुद्द्यावर मात्र भारताविरुद्धच्या त्यांच्या उलट्या बोंबा सुरूच होत्या. संयुक्त राष्ट्राच्या या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी बु-हान वाणीला हिरो ठरवण्याचा प्रयत्न केला. शरीफांच्या या वक्तव्यावर राईट टू रिप्लाय अंतर्गत भारताच्या इनाम गंभीर यांनी उत्तर दिलं. 

इनाम गंभीर यांनी न्यूयॉर्कमधल्या परिषदेत केलेलं भाषण मास्टरस्ट्रोक ठरलं. हे भाषण त्यांच्या वरिष्ठांनी लिहीलं होतं पण ज्या आत्मविश्वासानं आणि संयमानं इनाम गंभीर यांनी हे भाषण केलं, त्याचं कौतुक झालं.

इनाम गंभीर या 2005 च्या आयएफएस अधिकारी आहेत. याआधी परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी पाकिस्तान डेस्कबरोबर काम केलंय. त्यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठीची त्यांची निवड सार्थ ठरवली. 

नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण करताना भारताची तुलना चिडलेल्या बैलाशी केली होती पण शरीफांच्या या आक्रस्ताळेपणाच्या भाषणाला इनाम यांनी तितक्याच संयमानं पण रोखठोक उत्तर दिलं. 

आंतरराष्ट्रीय निधीचा दहशतवादासाठी वापर, दहशतवादासंदर्भात जागतिक स्तरावर देण्यात आलेल्या वचनाचा पाकिस्ताननं केलेला वचनभंग आणि बु-हान वाणी हा हिरो नव्हे तर दशहतवादीच हे तीन प्रमुख मुद्दे त्यांनी भाषणातून मांडले.

भारतात महिला आणि मुलांना मारलं जातं, असा उल्लेख शरिफांनी त्यांच्या भाषणात केला होता. पण भारतात महिलेला कसं वागवलं जातं, याचं चोख उत्तर देण्यासाठी इनाम गंभीर यांची निवड चोख ठरली. इनाम यांचं भाषण सुरू असताना पाकिस्तानी डेलिगेटसच्या चेह-यावरचे भाव पाहण्यासारखे होते. शेवटी जाता जाता इतकंच, इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत केलेलं हे भाषण म्हणजे फक्त एक ट्रेलर होता. सोमवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानला उत्तर देणार आहेत. त्यामुळे पिक्चर तो अभी बाकी है दुश्मन.