भारताचं सोनं गहाण पडणार?

ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2013, 12:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाच्या रिव्हेन्यू आणि करंट खात्यात वाढत चाललेला तोटा, हळुवार गतीनं सुरू असणारा विकासदर आणि ढासळत चाललेलं रुपयाचं मूल्य यामुळे सामान्यांप्रमाणेच सरकारचंही धाबं दणाणलंय. दिल्लीमध्येही चिंतेचं वातावरण दिसू लागलंय. ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...
‘देशाकडे ३१,००० टन सोनं उपलब्ध आहे. जर ५०० टन सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेत रोख रक्कम उचलण्याचा प्रयत्न केला तर चालू खात्यात होत असलेली घट थांबवता येऊ शकेल. हा केवळ एक विकल्प आहे. २००९ सालीही आपण असाच निर्णय घेतला होता’ असं आनंद शर्मा यांनी म्हटलंय.
या विकल्प अजुनही विचाराधीन आहे... याबद्दलचा कोणताही ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना वेगवेगळ्या पद्धतीनंच करावा लागेल, नव्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल, असंही शर्मा यांनी म्हटलंय.
‘सध्या आपण काही करू शकतो का? हा प्रश्न नाही तर माझ्या मते, नवी विचारधारा, नव्या उपाययोजनांची आपल्याला आवश्यकता आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय करावं लागेल यावर विचार करणं गरजेचं आहे’.

दरम्यान, बुधवारी रुपयाला डॉलरच्या तुलनेत आणखी मोठा धक्का बसलाय. रबाजार उघडताच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११८ पैशांनी रुपया कोसळला. बाजार उघडताच एका डॉलरसाठी तब्बल ६७.४२ पैसे मोजावे लागत होते... त्यानंतर थोड्याच वेळात रुपयानं ६८ चा अंकही पार केला. हा रुपयांचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा निचांक आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.