www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महिलांसाठी महिलांद्वारे संचालित केली जाणारी पहिली राष्ट्रीयकृत बँक म्हणजेच ‘भारतीय महिला बँक’ नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या कामाला सुरुवात करेल, अशी आशा व्यक्त केली जातेय. यासाठी बँकेत सुरुवातील ११५ प्रोबेशनरी ऑफिसर महिलांची भरती होणार आहे.
बँकेनं उमेद्वार महिलांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत. आपले अर्ज धाडण्यासाठी उमेद्वार ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवू शकतात. बँकेद्वारा जाहीर केलेल्या जाहीरातीत महिला अर्जदारांनी कोणत्याही विश्वविद्यालयाची (यूनिव्हर्सिटी) पदवी प्राप्त केलेली असायला हवी तसंच संगणकाबद्दल माहिती असायला हवी, अशा अटी नमूद केलेल्या आहेत.
यामध्ये नमूद केल्यानुसार भारतीय महिला बँक आपल्या पहिल्या सहा शाखा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, इंदोर आणि गुवाहाटीमध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यात येतील.
अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी वार्षिक बजेट सादर करताना देशात पहिली महिला बँक उघडण्याची घोषणा केली होती. यासाठी बजेटमध्ये १,००० करोड रुपयांची तरतूदही करण्यात आली. कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरू, जयपूर, लखनऊ, मैसूर आणि इंदोर या ठिकाणी या महिला सरकारी बँकांची शाखा प्रस्थापित होऊ शकते.
प्रस्तावित महिला बँकेचं मुख्यालय दिल्लीमध्ये असेल तर यावर्षी नोव्हेंबरपर्यंत या बँकेचं काम सुरू होऊ शकेल. रिझर्व्ह बँकेनं यापूर्वीच जून महिन्यात भारतीय महिला बँकेसाठी सैद्धांतिक मंजूरी दिलीय. महिलांच्या बँकिंग गरजा पूर्ण करणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणं, हा महिला बँकेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जा - http://www.sbicaps.com/Main/index.aspx
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.