www.24taas.com, नवी दिल्ली
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाद यांनी केला आहे.
या संदर्भात शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन या गोष्टींचा खुलासा केल आहे. रॉबर्ट वढेरा यांना ३५ ते ५० कोटींची संपत्ती केवळ ३ ते ५ कोटी रुपयांमध्ये देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केजरीवाल यांच्यासह वकील प्रशांत भूषणही उपस्थित होते. डीएलएळ या कंपनीने रॉबर्ट वढेरा यांना कोणत्याही तारणाशिवाय ६५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. तसेच या कर्जसाठी कोणतेही व्याज घेतले नाही. रॉबर्ट आणि त्यांची आई यांच्याकडे पाच कंपन्यांची मालकी आहे.
५० लाख संपत्ती असलेल्या रॉबर्ट वढेरांची संपत्ती आता ३०० कोटींच्या घरात असल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी लावला आहे. तसेच डीएलएफमध्ये रॉबर्ट वढेरा यांचे ५० टक्के शेअर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रशांत भूषण यांनी केली आहे. तसेच इतक्या स्वस्तात त्यांना ही संपत्ती कशी देण्यात आली याचीही चौकशी करण्यात यावी. इतक्या कमी कालावधीत त्यांनी इतकी संपत्ती कशी कमावली, याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच कोणत्याही तारणाशिवाय त्यांना कर्ज देण्यात आले आणि त्यावर व्याजही का आकारण्यात आले नाही.
या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसनेही दिली पाहिजे, अशी मागणी प्रशांत भूषण यांनी केली. या सर्व आरोपांसंदर्भातील ठोस दस्तऐवज असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.