www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच मुंबईकर गुरूदास कामत आणि किरीट सोमय्या यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुरूदास कामत हे राजस्थान काँग्रेसचे प्रभारी असून पहिल्यांदाच त्यांच्यासमोर राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता टीकवण्याचं आव्हान गुरूदास कामत यांच्यासमोर आहे. तर किरीट सोमय्या यांनीही राजस्थानतल्या प्रचारात आघाडी घेत कामत यांच्यासमोर आव्हान उभं केलंय.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत गेहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये सामना असला तरी एका मराठी माणसाची विशेष म्हणजे मुंबईकराची प्रतिष्ठा पणाला लागलीय. गुरूदास कामत हे राजस्थानचे प्रभारी असून त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस विधानसभेची निवडणूक लढवत आहे. गुरूदास कामत यांचा राजकीय इतिहास तसा यशस्वी राहिलाय.
कामत यांच्या नेतृत्वात नेतृत्वात मुंबई काँग्रेसनं गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलं होतं. त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव करत काँग्रेसनं त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची बक्षिसी दिली. मात्र अंतर्गत मतभेदामुळं नाराज झालेल्या कामतांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसपक्षश्रेष्ठींनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडे राजस्थानच्या प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागलीय.
महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारीही राजस्थानातल्या प्रचारात गुंतलेत. महाष्ट्रातून भाजपचे तब्बल छोटे-मोठे दीडशे पदाधिकारी राजस्थानमधील प्रचारात गुंतलेले आहेत. यात किरीट सोमय्या यांचा नंबर सर्वांत वरचा आहे. सोमय्यांनी राजस्थानमध्ये सभा आणि पत्रकार परिषदांचा धडाका लावलाय. महाराष्ट्रातले सहसंघटन मंत्री राजेंद्र फडके यांचाही समावेश आहे. राजस्थानमधील बहुसंख्य व्यापारी वर्गाचे मुंबईत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळं प्रचारासाठी नेते-कार्यकर्त्यांचं येण-जाणं नवीन नसल्याचं भाजपचं म्हणण आहे.
राजस्थान विधानसभेची निवडणूक असली तरी काँग्रेस आणि भाजपनं मराठी फौजा मोठ्या प्रमाणावर तैनात केल्याचं चित्र दिसतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.