www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात लोकपाल विधेयक मांडू देण्यास काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे दिल्ली विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असेल असे सांगून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे.
आज दिवसभर सुरू असलेल्या गदारोळानंतर चर्चेचे उत्तर देण्यासाठी सायंकाळी साडे सहा वाजता केजरीवाल उभे राहिले. यावेळी भाषण करताना त्यांना भाजप आमदारांनी अनेकवेळा हटकले. आपल्या भाषणाची सुरूवात करताना केजरीवाल म्हणाले, की आम्ही राजकारणात नवी आहोत. पण गेल्या काही तासांत झालेल्या घटनाक्रमाकडे पाहता मन दुःखी झाले आहे. राजकारण आम्हांला माहित नाही. पण जे अनेक वर्षापासून आमदार आहेत अशांकडून शिकण्याची मला आणि माझ्या सहकाऱ्यांना संधी होती. पण विधानसभेत माईक तोडणे, गदारोळ करणे हेच आम्ही पाहिले. माईक तोडणे हे क्लेश दायक होते.
विधानसभा हे मंदिर आहे. आपण मंदिरात जातो, मशिदीत जातो, गुरूद्वारामध्ये जातो. त्यावेळी असे बेशिस्त वागतो का? संसदेतील कागदपत्र गीता आणि कुरणा आहेत. आपण गीता आणि कुराण फाडतो का? असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले. संसद हे मंदिर आहे आणि त्या मंदिराचा अपमान झाला असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांनी भाजप आणि काँग्रेस यांना एकत्र आणल्याचा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आम्ही मुकेश अंबानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या पायाखालील जमीन सरकली. दोन्ही पक्षांना मुकेश अंबानी फंडिंग करतात. अंबानी यांना अडचणीत पाहत दोघे एकत्र झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी संपूर्ण राज्य घटना वाचली आहे. यात असे कुठेही लिहले नाही की कोणतेही विधेयक पारीत करण्यासाठी केंद्राची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. मी दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी राज्य घटनेची शपथ घेतली होती. केंद्र सरकारची नाही. त्यामुळे या राज्य घटनेसाठी मी आपला जीवही द्यायला तयार आहे. पण केंद्राचे आदेश बिलकुल ऐकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या पद्धतीने जनलोकपाल विधेयक मांडू दिलं नाही. ते पाहता १०० वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची माझी तयारी आहे. मला वाटते आहे की, हे दिल्ली विधान सभेचे शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणून त्यांनी आपले भाषण संपवले.
केजरीवाल राजीनामा नाट्याचा घटनाक्रम
10: 15 am: तडजोड नाहीः जनलोकपाल विधेयकावर तडजोड नाही – सिसोदिया
11:30 am: जंग यांचा चंग – माझ्या परवानगीशिवाय जनलोकपाल विधेयक मांडू नये
12:55 pm: आपवर दुहेरी हल्ला – काँग्रेस, भाजपचा आपवर हल्लाबोल
1:10 pm: हायकोर्टाकडे दाद – जनलोकपाल विधेयकाविरोधात हायकोर्टात याचिका
1:15 pm: केजरीवाल-जंग भेट – अरविंद केजरीवाल उपराज्यपाल जंग यांना भेटले
1:25 pm: काँग्रेसचा विरोध – जनलोकपाल विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा नाही
1:30 pm: काँग्रेसचा सरकार पाठिंबा – काँग्रेसचा आप सरकारला पाठिंबा कायम – लवली
1:45 pm: आपचा दावा – जनलोकपाल विधेयक घटनेनुसारच – सिसोदिया
1:55 pm: केंद्राची टीका – केंद्रीय मंत्र्यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका
2:30 pm: वर्धन आक्रमक – कायदा मंत्री सोमनाथ भारती यांची हकालपट्टी करा – हर्ष वर्धन
2:35 pm: भारती लक्ष्य – सोमनाथ भारती यांच्यावर चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी
3:10 pm: सभापतींची शिष्टाई - सभापतींनी सर्व पक्षीय बैठक बोलावली
3:30 pm: जंग पवित्रा – सभापतींनी उपराज्यपालांचे पत्र वाचून दाखविले.
3:45 pm: आपची भूमिका – उपराज्यपालांच्या पत्रावर मतदानाची गरज नाही - सिसोदिया
3:50 pm: विधेयक मांडलं – अरविंद केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडलं
4:00 pm: गोंधळ – सत्र २० मिनिटासाठी संस्थगित
4:15 pm: सभापतींवर हल्लाबोल- सभापतींनी आपल्या पदाचा गैरवापर केला – काँग्रेस सदस्य
4:55 pm: भाजप आक्रमक – सभापतींचे वागणे खपवून घेणार नाही - हर्ष वर्धन
4:55 pm: विधेयकाला काँग्रेस विरोध- विधेयक सादर करण्याला काँग्रेस आमदार अरविंद सिंग लवली यांचा विरोध