भाजपला चपराक, गुजरातपेक्षा महाराष्ट्र आघाडीवर

सध्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र हा गुजरातच्या मागेच आहे, असा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र मागे असल्याचे म्हटलंय. 

Updated: Oct 8, 2014, 11:06 AM IST
भाजपला चपराक, गुजरातपेक्षा महाराष्ट्र आघाडीवर title=

नवी दिल्ली : सध्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र हा गुजरातच्या मागेच आहे, असा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र मागे असल्याचे म्हटलेय. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने प्रसिद्ध केलेल्याआकडेवाडीवरून महाराष्ट्रच नंबर वन असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेते खोटं आणि रेटून बोलत असल्याचं यानिमित्ताने पुढे आले आहे.  तर रोजगाराच्या निकषावर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच गुजरातपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी दुप्पट आहे.

केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीत, महाराष्ट्र गुजरातच्या खूप पुढे असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भाजपच्या 'कुठे, नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा', या अॅड कॅम्पेनला आघाडी सरकारच्या 'सर्वात पुढे महाराष्ठ्र माझा'ने चपराक लगावल्याचं दिसून येत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

महाराष्ट्राचं सकल उत्पन्न (जीडीपी) हे गुजरातच्या दुप्पट आहे. राज्याची थेट परदेशी गुंतवणूक २.४१ लाख कोटी इतकी आहे. गुजरातमध्ये ती फक्त ३५, ९२७ कोटी रुपये इतकी आहे, असं महाराष्ट्र नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांनी सांगितलं. 

गुजरात मागेच, महाराष्ट्रच पुढे असच चित्र आहे. मात्र, महाराष्ट्र पाठी असल्याचे दाखविण्यात येत आहे.  मानव विकास निर्देशांकाच्या निकषावरही महाराष्ट्र गुजरातच्या पुढे आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात साक्षरतेचा दरही अधिक आहे. महाराष्ट्रात अर्भक मृत्यू दरही गुजरात पेक्षा कमी आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास, महाराष्ट्र अनेक निकषांवर गुजरातपेक्षा पुढे असल्याचं दिसून येत आहे. जीडीपी अर्थात सकल उत्पनाच्याबाबतीत महाराष्ट्राने २००१-०२ सालापासून ते आजपर्यंत गुजरातवर आपली आघाडी कायम ठेवली आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या सहाव्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, रोजगार निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. तर आस्थपनच्या (इस्टॅब्लिशमेंट) बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या अहवालानुसार देशात रोजगारात असलेल्या १ कोटी २७ लाख लोकांपैकी, महाराष्ट्रात १४ लाख म्हणजेच ११.६२ टक्के, तर गुजरातमध्ये ९ लाख म्हणजे ७ टक्के लोकांना रोजगार आहे. पाचव्या आर्थिक सर्वेक्षण (२००५) आणि सहाव्या आर्थिक सर्वेक्षणाच्या काळात आस्थापनांच्या वाढीचा दर ४१.७३ टक्के होता.

देशातील एकूण आस्थपनांपैकी महाराष्ट्रात साठ लाखांहून अधिक म्हणजेच १०.४ टक्के तर गुजरातमध्ये ४० लाख म्हणजेच ६.८३ टक्के आस्थापना आहेत. आस्थापनांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ मणिपूर (१०९.३७ टक्के) सिक्कीम (१०२.९२ टक्के ), आसाम (१००.१७टक्के), नागालँड (७८.७४ टक्के), तेलंगणा (७८.७० टक्के), उत्तर प्रदेश (६७.८० टक्के), गुजरात (६७.०७ टक्के) आणि हिमाचल प्रदेश (६०.९८ टक्के) या राज्यांचा समावेश आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.