इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना जोधपूरमध्ये पकडलं

दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 24, 2014, 09:35 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, जयपूर
दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.
दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पकडलेल्या दहशतवाद्यांमध्ये आयएमचा पाकिस्तानी कमांडर वकास (२४) याचा समावेश माहिती मिळतेय. वकास हा यासिन भटकळचा जवळचा साथीदार मानण्यात येतंय. त्याच्यावर १० लाख रुपयांचं बक्षिस होतं. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपलं टार्गेट होते, अशी कबुली दहशतवाद्यांनी दिल्याचं वृत्त आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
बॉम्ब निर्मितीच्या कामात तज्ज्ञ असलेला वकास सप्टेंबर २०१० मध्ये असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी याच्यासोबत पहिल्यांदाच भारतात आला होता. पुढं असदुल्ला अख्तर आणि यासिन भटकळ या दोघांना अटक झाल्यामुळं वकास काही काळ गप्प होता. तो सक्रीय झाल्याची ठोस माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला सहकाऱ्यांसह अटक केली.
दरम्यान, दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मोदी असल्याची माहिती मिळाल्यामुळं दिल्ली पोलीस केंद्रीय गृहखात्याला सविस्तर अहवाल देणार आहेत. हा अहवाल मिळाल्यानंतर गृहखाते मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.