www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी केंद्राशी झालेल्या पत्रव्यवहाराचा वाद बराच रंगलाय. पत्र कोणी पाठवलं, यावरून वाद झडल्यानंतर आता ही पत्रं शेतक-यांच्या भल्यासाठी लिहिली की कंत्राटदारांच्या, यावरून तू-तू, मै-मै सुरू झालंय...
विदर्भातल्या गोसीखुर्द प्रकल्पाबाबत केंद्रीय पाणीपुरवठा मंत्री पवनकुमार बन्सल यांना भाजपा अध्यक्षांनी पत्र पाठवलं. या पत्राच्या निमित्तानं काँग्रेसनं गडकरींवर टीकेची झोड उठवली होती. दिल्लीत एका कार्यक्रमात गडकरींनी या टीकेला उत्तर दिलं. एक नव्हे, तर पाच पत्र लिहिली आहेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही पत्र पाठवीन, अशा रोखठोक शब्दांत त्यांनी आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मात्र गडकरींनी पाठवलेलं पत्र कंत्राटदारांच्या भल्यासाठी होतं, असा दावा केलाय. खरंतर स्वतः माणिकरावांनीही बन्सल यांच्याशी गोसीखुर्द प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार केला होता. पण आपलं पत्र शेतक-यांच्या भल्यासाठी होतं, असाही माणिकरावांचा दावा आहे. अकोल्यातलं नेरधामना बॅरेज लवकर पूर्ण झाल्यास 8 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. त्यामुळे या प्रकल्पाला तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माणिकरावांनी केली.
काँग्रेसचे आणखी एक नेते, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनीही गोसीखुर्द धरणाबाबत केंद्राला पत्र पाठवल्याचं झी 24 तासनं समोर आणलंय. गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण होण्यास निधीची अडचण असल्याचं वासनिक यांनी नमूद केलंय. थोडक्यात, विविधपक्षीय नेत्यांनी हा पत्रप्रपंच केल्याचं समोर आल्यानंतर आता परस्परांच्या हेतुबद्दल शंका घेतली जाऊ लागलीये.