मायावतींकडून 'आरएसएस'ला 10 लाख रुपयांचं दान!

लखनऊस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बनवण्यात आलेल्या माधव सेवा आश्रमावर केवळ भाजपच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींचीही मेहरनजर असल्याचं समोर आलंय. 

Updated: Mar 31, 2016, 03:08 PM IST
मायावतींकडून 'आरएसएस'ला 10 लाख रुपयांचं दान! title=

लखनऊ : लखनऊस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बनवण्यात आलेल्या माधव सेवा आश्रमावर केवळ भाजपच नाही तर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींचीही मेहरनजर असल्याचं समोर आलंय. 

2002 साली माधव सेवा आश्रमाच्या लोकार्पणाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी मुख्यमंत्री निधीतून आश्रमाला 10 लाख रुपयांचं दान दिलं होतं. तर राजनाथ सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या आश्रमाला 50 लाखांचं दान दिलंय. 

संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आश्रमाच्या लोकार्पण सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि गव्हर्नर विष्णुकांत शास्त्री यांच्यासोबत मुख्यमंत्री मायावतीदेखील आल्या होत्या. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी 10 लाखांचा चेक पाठवून दिला. 

यावर, मायावती सत्तेसाठी काहीही करू शकतात, असं सांगत काँग्रेसनं मात्र जोरदार टीका केलीय. जेव्हा तीन वेळा मायावती भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री बनू शकतात, तेव्हा माधव सभागृहासाठी 10 लाखांचं दान काही फार मोठं आश्चर्य नाही.