www.24taas.com, नवी दिल्ली
आपल्या बातम्या बाहेर येऊ नयेत यासाठी बड बडे उद्योगपती मीडियाला विकत घेतात..कोळसा घोटाळ्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासाठी हा खेळ नवा नाही. याचा खुलासा करण्यासाठी कोणत्या पुराव्याचीही गरज नाही..गुगलवर जा आणि फक्त रमेश अग्रवाल, आरटीआय आणि जिंदाल हे तीन शब्द टाईप करा...तुमच्यासमोर येईल एक वेदनादायी सत्य...नवीन जिंदाल यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवणा-या आरटीआय कार्यकर्त्याचा आवाज दडपडण्याचा प्रयत्न झाला
एस.एम.पाणीग्रही आणि के.के.चोप्रा हे दोघंही उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या कंपनीला सुरक्षा देणारे आहेत. छत्तीसगडमधील रायगडच्या कोर्टात 3 महिन्यांनंतर त्यांनी शरणागती पत्करलीय. जिंदाल पॉवर अँन्ड स्टीलमधील कोळसा घोटाळ्याविरोधात आवाज उठवणारे आरटीआय कार्यकर्ते रमेश अग्रवाल यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आधी अग्रवाल यांच्यावर 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आणि सुटकेनंतर लगेचच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील आरोपी ब्रिगेडियर चोप्रांनी याआधी उडीसातल्या अंजुल पॉवर प्लांटमध्ये नवीन जिंदाल यांना विरोध करणा-यांवर गोळी चालवलीय. हा खटलाही कोर्टात सुरू आहे.
ब्रिगेडियर के.के.चोप्रा सेफ्टी फायर सिक्युरिटीचे डायरेक्टर आहेत आणि एस.एम.पाणीग्रही नवीन जिंदाल यांच्या अंजुल प्रकल्पात डेप्युटी जीएम सिक्युरिटी आहेत. याआधीही जिंदाल स्टीलमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारे तारकेश्वर रॉय, उडीसातील शार्प शूटर सुनील बेहरा, संग्राम सिंग आणि हरीष पात्रो यांना अटक करण्यात आलीय. मात्र नवीन जिंदाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणा-या रमेश अग्रवाल यांना पोलीस यंत्रणेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही.
आश्चर्याची आणखी एक गोष्ट म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणा-या अग्रवाल यांच्या अटकेसाठी पोलिसांनी एखाद्या दहशतवाद्याच्या अटकेप्रमाणं तयारी केली होती. दुसरीकडे हेच पोलीस नवीन जिंदाल यांच्या इशा-यांवर चालणा-या आरोपींच्या शरणगतीची आरामात वाट पहात होते.