www.24taas.com, झी मीडिया, तिरूअनंतपुरम्
केरळमध्ये लवकरच माकडांची शाळा भरणार आहे... ही माकडचेष्टा नाही, अगदी खरीखुरी बातमी आहे.. या शाळेत माकडं विद्यार्थी असतील, त्यांना रीतसर ट्रेनिंग दिलं जाईल... कसलं...? पाहा एक रिपोर्ट.
बडे काम का बंदर... हर हिरो की खुबी इसके अंदर... माकडांच्या याच खुबीचा आता बहुखुबीने वापर करण्याची योजना केरळमध्ये आकाराला येतंय.. गॉड्स ओन पॅरेडाईज असं ज्या भूमीचं वर्णन केलं जातं, त्या केरळमध्ये हनुमानाच्या वंशजांची शाळा भरणार आहे... त्याठिकाणी माकडांना चक्क प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जाणारंय... कसलं? नारळाच्या झाडांवर चढण्याचं.
आता हा काय खुळेपणा, असं तुम्हाला वाटेल.. माकडांना आणि झाडावर चढण्याचं ट्रेनिंग..? तर होय... त्यांना नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्याचं कसब शिकवलं जाणारंय... एकदम प्रोफेशनल पद्धतीनं.... आणि हे ट्रेनिंग कुणी ऐरागैरा मदारी नाही, तर चक्क टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टिस देणार आहे.
नारळ हे केरळमधलं नगदी उत्पन्न देणारं पिक आहे. परंतु सध्या प्रॉब्लेम असा आहे की, नारळाच्या उंच झाडावर चढून नारळ खाली उतरवायला कसबी मनुष्यबळच सध्या मिळत नाही.. कोची, केरळमध्ये जवळपास १५ दशलक्ष नारळाची झाडे असून, त्यावरून नारळ खाली काढण्यासाठी सुमारे ३० ते ४० हजार माणसांची गरज आहे. परंतु झाडावर चढणा-या माणसांची सध्या याठिकाणी प्रचंड कमतरता भासतेय.
आता झाडावर चढणं म्हणजे माकडांच्या दोन्ही हातचा मळ. त्यामुळं नारळ उतरवण्याच्या या कामासाठी माकडांची मदत घेण्याची योजना टिसनं आखलीय. माकडांना प्रशिक्षित करण्यासाठी टिसनं एक रीतसर प्रस्तावच केरळ सरकारला पाठवलाय. टिसचे संचालक एस. परशुरामन यांनी बँकॉकमध्ये हा मंकी बिझनेस पाहिला... माणसं जशी झाडावर चढून नारळ काढतात, तेच काम बँकॉकमध्ये प्रशिक्षित माकडांकडून करून घेतलं जातं... त्यावरून परशुरामन यांना ही आयडियाची कल्पना सूचली.
आता या कोचिंग क्लासमध्ये माकडांना काय शिकवायचं, याचा पाठ्यक्रमही त्यांनी तयार केलाय. प्रत्येक माकडाला नारळ झाडावरून कसा काढायचा, खाली पडलेले नारळ कसे गोळा करायचे, गोळा केलेले नारळ पोत्यामध्ये कसे भरायचे आणि ते पोतं वाहनामध्ये नीट कसं ठेवायचं, असा हा क्रॅश कोर्स असणार आहे.
त्यामुळं येत्या दिवाळीच्या सुट्टीत केरळला फिरायला गेलात आणि नारळाच्या झाडावर माकड दिसलं तर उगीचच त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करू नका. बिच्चारं माकड कदाचित आठ तासांच्या शिफ्टमध्ये आपलं काम करत असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ