मोदी आशीर्वादासाठी वाकलेत, अडवाणींनी पाहिलंही नाही!

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कमालीचे नाराज झाले. आज ही नाराजी जाहीररित्या व्यासपीठावर दिसून आली. मोदी आर्शीवादासाठी वाकलेत मात्र, अडवाणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 25, 2013, 08:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कमालीचे नाराज झाले. आज ही नाराजी जाहीररित्या व्यासपीठावर दिसून आली. मोदी आर्शीवादासाठी वाकलेत मात्र, अडवाणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
तीव्र नाराजीनंतर नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी प्रथम एकाच व्यासपीठावर आलेत. यावेळी मोदींनी अडवाणी यांनी पुष्पगुच्छ दिला. त्यावेळी त्यांनी मोदींकडे पाहिले नाही. तर मोदींनी अडवाणींचे आर्शीवाद घेतले त्यावेळी अडवाणी यांनी शिवराज चौहान यांच्याकडे पाहणे पसंत केले. त्यामुळे अडवाणींची नाराजी जाहीररित्या व्यासपीठावर दिसून आली.
भोपाळमधील कार्यकर्ता महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, दोन्ही नेत्यांमधील `अंतर` कायम असल्याचे अडवाणींच्या कृतीतून दिसून आले. मोदींबाबत आडवाणींच्या मनात असलेली नाराजी दूर करण्यात आल्याचं भाजपची मंडळी भासवत असली तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. हे आज जाहीररित्या कॅमेऱ्यात कैद झालं.
अडवाणी यांनी मोदींच्या बाजूच्या खुर्चीवर बसणं अपेक्षित होतं पण, ते त्यांनी टाळलं. या दोन्ही नेत्यांची मनं जुळवण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भाजपाध्यक्ष राजनाथ यांनाच येथेही दोघांच्या मधल्या खुर्चीवर बसावं लागलं. सभा सुरू होण्याआधी स्वागताचा कार्यक्रम झाला. तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करण्यात आले तर अडवाणी यांनी मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पुष्पगुच्छ दिला. यावेळी शिवराज यांनी आडवाणींचे आशीर्वाद घेतल्यानंतर मोदीही पाया पडण्यासाठी वाकले. यावेळी अडवाणींनी मोदींकडे साधे पाहिलेही नाही.
२०१४ मध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या हितासाठी काँग्रेसने सीबीआयचा वापर केला आहे. देशाची वाट काँग्रेस सरकारमुळे झाली आहे, असे मोदी म्हणालेत. त्यापूर्वी अडवाणी यांनी मोदींचे भाषणात नाव घेतले. हा भाषणातील मोदींचा उल्लेख वरवरचा होता. मोदींपेक्षा भाजपचाच डंका वाजवत भाजप हा देशातील सर्वोत्तम पक्ष असल्याचं त्यानी सांगितलं.

पाहा व्हिडिओ

मोदींचे भाषण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.