नवी दिल्ली : एनडीएच्या घटकपक्षांच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत २०१९च्या निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकण्यात आलं. २०१९च्या निवडणुकांसाठी मोदींच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करण्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांबरोबरच एनडीएतले सगळेच बडे नेते हजर आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. एनडीएतल्या घटकपक्षांच्या संघटनात्मक समन्वयासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती एनडीएचे निमंत्रक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली. या बैठकीत तब्बल ३३ पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याचा दावा जेटलींनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणानं चर्चा झाल्याचंही जेटलींनी नमूद केलं.