www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राळेगणसिद्धी दौरा रद्द झाला आहे. आजारी असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी राळेगणसिद्धीला जाणं टाळलं आहे. दरम्यान, कुमार विश्वास आणि गोपाल राय आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणला जाणार आहेत.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आतापर्यंत गर्दी न खेचणाऱ्या अण्णांच्या आंदोलनात नवी जान आणण्यासाठी अरविंद केजरीवाल आज राळेगणसिद्धीला जाणार होते. मात्र, ताप आल्याने केजरीवाल यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. काल दिल्लीत विजय उत्सव साजरा करणाऱ्या केजरीवाल हे कसे काय आजारी पडले, असा सवाल उपस्थित कऱण्यात आला आहे.
नवी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं. पण व्यासपीठावर अण्णांसोबत न बसता लोकांमध्ये बसणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली होती. आज ते आजारी असल्याचे सांगून त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.