www.24taas.com, नवी दिल्ली
आता देशात पाच ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये `स्मार्ट सिटी` विकसित करण्यात येणार आहे. तशी माहिती केंद्रीय नगर विकास मंत्री कमलनाथ यांनी दिली.
कमलनाथ यांनी स्पष्ट केले की, ऑस्ट्रिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मदतीने पाच ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये `स्मार्ट सिटी` सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे युरोप, अमेरिकेप्रमाणे येत्या काही वर्षांत शहरे चकाचक झाल्यास आश्च र्य वाटायला नको.
ऑस्ट्रियाच्या नगर विकास मंत्री डोरिस ब्यूरेस आणि त्या देशाचे प्रतिनिधी यांच्याशी कमलनाथ यांनी `स्मार्ट सिटी` योजनेवर ब्लू प्रिंट तयार करण्याबाबत चर्चा केली. ऑस्ट्रिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मदतीने `स्मार्ट सिटी` सुरू करण्याबाबत विचारविनिमय आहे, असे कमलनाथ म्हणाले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून जबलपूर आणि उज्जैन ही शहरे स्मार्ट करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात शहरांमध्ये वाहतूक समस्या कायम आहे. यात दिवसागणित वाढ होत आहे. रस्ते वाढीसाठी आणि नवी परिवहन व्यवस्था विकसित करण्याला प्राधान्य देण्यावर भर असणार आहे.
`स्मार्ट सिटी` मध्ये अत्याधुनिक परिवहन सेवा, पर्यावरणाला अनुकूल प्रकल्प, चकाचक रस्ते, ब्रॉड बँडची सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदींच्या सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे.