पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे

जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.

Updated: Sep 18, 2016, 08:03 PM IST
पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे

नाशिक : जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.

जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झालाय. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलंय.. तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.चारही दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचं समोर आलंय. या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असल्याचं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी म्हटलंय.

सुभाष भामरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला घेरण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले, प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक होत असून, या बैठकीत माझी भूमिका हीच असेल. लंडनमध्ये गेल्यानंतर सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात मी जगातील संरक्षणमंत्र्यांपुढे भूमिका मांडलेली आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अमेरिका फ्रान्ससह इतर देशांसोबत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत असलेल्या देशांनी दहशतावादासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.