www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कांद्याच्या दरात झालेली दरवाढ पुढील दोन ते तीन आठवड्यात कमी होईल. कांद्याची किंमत आवाक्यात येईल, असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पवार यांनी किंमत कमी होण्याची शक्यता वर्तविली तरी कांदाची आवकच कमी असल्याने किंमत खाली कशी येईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कांदा हा प्रामुख्याने महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून दिल्लीमध्ये येत आहे. दिल्लीतही कांद्याची किंमत वाढली आहे. कांदा ८० रूपये किलोने विकला जात आहे. तर महाराष्ट्रात किरकोळ बाजारात कांद्याचा दर ५० रूपयांवरून थेट ७० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारात कांदा उपलब्ध करण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यासाठी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कांद्याने सहा हजारी टप्पा पार केला आहे. त्यामुळे रीटेल बाजारात कॅनडामधील पेट्रोलपेक्षाही कांदा महाग झाला आहे.पावसाळी ओलसर वातावरण असल्याने कांद्याची आवक बाजारपेठेत मोजकी होत असल्याने भाव तेजीत राहणार आहेत.
कांद्याचे हे भाव क़डाडल्याने आता सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. कांदा सर्वसामान्यांना रडवणार हे मात्र, निश्चित आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.