नवी दिल्ली: आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या कारणामुळं आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून २००५ पूर्वीच्या सर्व नोटा व्यवहारातून बाद केल्या जाणार आहेत. त्यामुळं लोकांनी आपल्याकडील या सर्व नोटा बँकेच्या माध्यमातून बदलून घ्याव्यात, असं आवाहन 'आरबीआय'कडून करण्यात आलं होतं. याची शेवटची तारीख १ जानेवारी होती, मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. आता नोटा बदलून घेण्याची अंतिम तारिख ही ३० जून असून त्यापूर्वी लोकांनी आपल्याकडील नोटा बँक खात्यात जमा कराव्यात, अथवा त्या बँक शाखांकडून बदलून घ्याव्यात असे 'आरबीआय'नं सांगितलंय.
नोटांची ओळख
२००५ पूर्वीच्या नोटांवर त्यांच्या छपाईची तारीख देण्यात आली नाही. त्यामुळं नोटांच्या पाठीमागे त्याची छपाई तारीख नसल्यास अशा नोटा संबंधित बँक खात्यांकडे जमा कराव्यात अथवा त्या बदलून घ्याव्यात, असं आवाहन 'आरबीआय'नं लोकांना केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.