शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीतील बैठकीत नक्की काय घडले?

शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार यांनी केला.  

Updated: Aug 13, 2015, 09:54 AM IST
शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीतील बैठकीत नक्की काय घडले? title=

नवी दिल्ली : तिसऱ्या आघाडीची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केली. पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. बैठकीच्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन देशातील सद्य परिस्थितीतील विविध समस्यांवर चर्चा करावी, असे ठरले. वाढती बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार यांसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आणण्याबाबत या सर्व विरोधी दलांचे एकमत झाले, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षांची एकत्रित फळी सामूहिक प्रयत्नांद्वारे अधिक सक्षम राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी कटिबद्ध राहील व समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी नियोजनपूर्वक एकत्र येईल, असा संकल्प ठरवला गेला. 

या बैठकीला जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयूचे अध्यक्ष शरद यादव हे हजर होते. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही पवार यांना फोन करून या विरोधकांच्या फळीत सामील होण्याची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली. परंतु त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलेय. 

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तारिक अन्वर, महंमद फैजल तसेच प्रफुल पटेल उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत देशातील समविचारी नेते एकत्र आले असून, यातून तिसऱ्या आघाडीचा अर्थ कोणी काढू नये, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दुपारीच दिले होते. त्यामुळे ही बैठक कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.