पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं

दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

Updated: Mar 23, 2015, 04:53 PM IST
पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं title=

नवी दिल्ली: दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

तसंच पाकिस्तान दिवसानिमित्त आयोजित दावतचं निमंत्रण पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिलंय. भारत-पाक संबंध सुधारावेत अशी आशा बासित यांनी व्यक्त केलीय. मात्र दुसरीकडे दावतचं आमंत्रण देत असताना बासित यांनी काश्मीरचा राग आळवलाय.

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडून मसरत आलमला या समारंभासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यानं समारंभास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपण या कार्यक्रमास जाऊ शकत नसल्याचं मसरत आलमनं स्पष्ट केलं.

मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयामुळं नुकताच गदारोळ माजला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यात मसरत आलमचाही समावेश होता.  २०१०मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणाऱ्याला तत्कालीन सरकारनं १० लाख रुपयांचं पारितोषिकही जाहीर केलं होतं. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्यानं सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली. तसंच विरोधकांनी केंद्र सरकारवरही टीका करत या निर्णयाचा निषेध केला होता. 

आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही विरोधकांनी सभागृहात केली होती, या मुद्यावरून संसदेचं कामकाजही बराच काळ ठप्प झालं होतं. या सर्व घटना ताज्या असतानाच पाकिस्तान डेच्या समारंभासाठी मसरत आलमला निमंत्रण देण्यात आल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाकिस्तान दिनासाठी  फुटीरतावाद्यांना निमंत्रण मिळणं ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. सरकारनं याविरोधात कठोर पाऊलं उचलली पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेनं केली असून दिल्लीत पाकिस्तान दिनाविरोधात निदर्शनं करण्यात आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.