www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी तारिक ऊर्फ एनुल यांच्या मृत्यूनंतर त्याचं शव ताब्यात घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कमिटीनं त्याचा दफनविधी पार पाडला.
तारिकचा बॉम्बस्फोटात हात असल्याचं कळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेहही ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तारिकला आपल्या घरच्यांच्या हातानं शेवटची मातीही मिळाली नाही. सोमवारी मॅजिस्ट्रेट किशुन महतो यांच्या देखरेखीखाली बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कमिटीनं तारिकचा मृतदेह ‘पीरमुहानी कब्रस्तान’मध्ये दफन केला. कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं त्याच्या दफनविधीचा निर्णय घेतला होता.
पूर्ण सुरक्षेसह तारिकचा मृतदेह पाटणा जंक्शन स्थित शवदान गृहातून कब्रस्तानात आणला गेला. संपूर्ण रिती-रिवाजांसहीत एनुलच्या पार्थिवाचा दफनविधी पार पाडण्यात आला.
रेल्वे एसपी उपेंद्र कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ७२ तासांपेक्षा जास्त वेळ एनुलच्या कुटुंबीयांची वाट पाहिली परंतु कुणीही आलं नाही त्यामुळे त्याच्या मृतदेह बेवारस म्हणून दफन केला गेला.
२७ ऑक्टोबर रोजी मोदींच्या हुंकार रॅलीच्या आधी पाटणा जंक्शनवर बॉम्ब लावण्याच्या प्रयत्नात झालेल्या बॉम्बस्फोटात तारिक गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान आयजीआयएमएस हॉस्पीटलमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.