मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून होत जाणारी घट पाहून तुम्ही खुश झाला असाल तर आता मात्र तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ झालीय. कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या दोन महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच ४० डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्यात. त्यामुळे, येत्या दोन महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती ५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाचं उत्पादन घटल्यामुळे आणि २० मार्च रोजी क्रूड उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'च्या बैठकीत उत्पादन कमी झाल्याच्या कारणामुळे ही वाढ होणार आहे.
'ब्रोकरेज हाऊस क्रेडि सुइस'नुसार, फेब्रुवारी महिन्यापासूनच क्रूड ऑईलच्या फंडामेन्टलमध्ये बदल सुरू झालेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये सध्या तरी मंदीचं कोणतंही वारं दिसत नाही. त्यामुळे, क्रूड ऑईलच्या किंमतीत सुधार झालीय. त्यामुळे, मे महिन्यापर्यंत कच्च्या तेलाची किंमत ५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.