संपूर्ण पगारावर कापला जाणार पीएफ

बचतीच्या दृष्टीनं पाहिलं तर नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी... येत्या काही दिवसांमध्ये तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ संपूर्ण पगारावर कापला जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2013, 08:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बचतीच्या दृष्टीनं पाहिलं तर नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी... येत्या काही दिवसांमध्ये तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ संपूर्ण पगारावर कापला जाणार आहे.
आता सध्या तुमचा पीएफ केवळ तुमच्या मूळ (बेसिक) पगारावर कापला जातो. पण, येत्या काहि दिवसांमध्ये हाच पीएफ बेसिक पगारासोबतच विविध भत्त्यांवरही लागू होणार आहे. यामुळे दोन महत्त्वाचे परिणाम होतील ते म्हणजे, प्रत्येक महिन्याला तुमच्या हातात सध्यापेक्षा कमी रक्कम पडेल परंतू दुसरा फायदा असा होईल की भविष्यात मिळणारी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम मात्र मोठी असेल. म्हणजेच तुमची बचत जास्त असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच नवीन नोटिफिकेशन काढणार आहे. याद्वारे संपूर्ण पगारावरच पीएफ लागू केला जाईल.
सध्याच्या नियमांनुसार, पीएफ केवळ बेसिक पगार आणि डीए (डिअरनेस अलावन्स) जोडून आलेल्या रकमेवर १२ टक्के इतका कापला जातो. आणि जितकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाते तितकीच रक्कम संस्थांनाही द्यावी लागते. नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांसोबत संस्थांनाही किंवा कंपन्यांनाही भराव्या लागणाऱ्या पीएफ रकमेत वाढ होणार आहे.

नव्या नियमांमुळे उद्योग जगतात मात्र चर्चा सुरू झालीय. साहजिकच, उद्योग जगतानं या नव्या नियमांचा विरोध करण्याची तयारी सुरू केलीय. परंतू श्रम मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेकडून याची अंमलबजावणी सुरू होईल.