उत्तराखंड : ध्येयवेड्या... `त्या` दोन जोड्या!

उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 26, 2013, 02:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत. हवाईदलात तैनात असलेली दोन ‘कपल्स’ एकाचवेळी उत्तराखंडच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये गुंतलेत. तेही वैयक्तिक संबंध बाजूला ठेवून...
स्क्वॉड्रन लीडर एस. के. प्रधान आणि त्यांची पत्नी पायलट स्क्वॉड्रन लीडर खुशबू... तसंच स्क्वॉड्रन लीडर विक्रम आणि फ्लाईट लेफ्टनंट तान्या... या दोन जोड्यांना एकाच वेळी एकाच लढाईमध्ये उतरावं लागलंय. उत्तराखंडमधल्या खराब हवामानात दऱ्यांमधून, जंगलांमधून, डोंगराळ भागांमधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या ते करत आहेत. दोघं एकमेकांसमोर आले तरी एकमेकांना लष्करी अभिवादन करत आपल्या कामाला लागणारी ही चौघं जण सूर्य पुन्हा गडप होईपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आपला जीव पणाला लावून काम करतात. संध्याकाळी एकमेकांना भेटतात तेव्हा आवर्जून आपल्या दिवसाची, अनुभवांची चर्चा करतात.
एस. के. प्रधान आणि खुशबू यांच्या लग्नाला चौर वर्ष झालीत. परंतू दोघांना पहिल्यांदाच एकाच फिल्डवर काम करण्याची ही पहिलीच संधी मिळालीय. इंडियन एअरफोर्समध्ये काम करण्याचं पूर्ण झालेलं स्वप्न आता दोघांच्याही अंगाअंगात भिनलंय. विक्रम आणि तान्याचंही असंच... मागच्याच वर्षी दोघांचं लग्न झालेलं आहे... पण, दोघंही गेले १०० हून अधिक तास उत्तराखंडमध्ये बचावकार्यात मग्न आहेत.

प्रधान म्हणतात, ‘आम्हाला जी गोष्ट स्पेशल बनवते ती म्हणजे... इंडियन एअरफोर्सच्या सिद्धांतावर जगण्याची संधी मिळणं... मी आणि खुशबुनं कधी हा विचारही केला नव्हता किंवा अपेक्षाही केली नव्हती की आम्हाला एकाच वेळी एकाच मिशनवर काम करण्याची संधी मिळेल’. तान्या म्हणते, काम आणि नातेसंबंध वेगळे ठेवण्याची शिकवण आम्हाला ट्रेनिंग दरम्यानच दिली गेलीय.
ही दोन्ही कपल्स सकाळी मिशनवर निघताना एकमेकांना अंगठा उंचावून बेस्ट लक म्हणतात आणि कामाला लागतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.