नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानला दिलेली सरप्राईज भेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. एकीकडे त्यांच्या या भेटीला समर्थन दिले जात आहे तर दुसरीकडे विरोधक या भेटीवर कडाडून टीका करत आहे. मोदींच्या पाकिस्तान भेटीदरम्यान आणखी एक घटना घडलीये. नवाझ शऱीफ यांच्या भेटीसाठी लाहोरमध्ये गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी तेथे पोहोचताच शरीफ यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.
जेव्हा मोदी शरीफ यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शरीफ यांचा मुलगा हसन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तेथे उपस्थित होते. यावेळी शरीफ यांची आईही तेथे होती. मोदी यांनी शरीफ यांच्या आईला पाहताच ते त्यांच्या पाया पडले.
त्यानंतर मोदींनी नवाझ यांच्यासह दुपारचे भोजन केले. या भोजनात मोदींच्या आवडीचे जेवण साग, डाळ असे शाकाहारी जेवण बनवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जेवण शुद्ध तुपात बनवण्यात आले होते.