नवी दिल्ली : लघु उद्योजकांना तात्काळ कर्ज मिळावे. तसेच छोट्या संस्थाना लाभ मिळावा, यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बॅंकेची घोषणा केली होती. या मुद्रा बॅंकेसाठी २० हजार कोटींची तरतूद केली. या बॅंकेचे पंतप्रधान मोदी यांनी आज उद्घाटन केले.
जन-धन योजनेला चांगले यश मिळाले. त्याप्रमाणे मुद्रा बँकेचा नागरिकांना लाभ होईल. मुद्रा बँकेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना दिलेल्या कर्जामुळे देशाच्या प्रगतीत मदत होईल. मुद्रा बँकेच्या माध्यमातून तीन प्रकारची कर्जे देण्यात येणार आहे. बचत हा भारतीयांचा स्वभाव असून, कमी व्याजदराने कर्जे उपलब्ध होणार आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून दहा लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात मुद्रा बॅंक (मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. या बँकेसाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकार लहान व्यावसायिक, बचत गट, लहान मायक्रो-फायनान्स कंपन्या, एनबीएफसी व ट्रस्ट यांसारख्या संस्थांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुद्रा बॅंकेसाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी पुनर्वित्त निधी बनवला जाणार आहे. ज्यामध्ये बॅंकेद्वारा प्राथामिक क्षेत्राला दिलेल्या रकमेतून शिल्लक रक्कमेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच राज्य व जिल्हा पातळीवर समन्वयक म्हणून देखील बॅंक काम करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.