www.24taas.com, झी मीडिया, रायबरेली
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच `रिमोट कंट्रोल` होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा मैदानातून त्या माघार घेणार असून त्यांची जागा त्यांच्या सुपूत्री प्रियांका गांधी घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रियांका गांधी सोनियांच्या रायबरेली मतदारसंघातून येणारी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. तसे झाल्यास सोनिया नेमक्या निवडणूक लढणार की पक्षावर रिमोट कंट्रोलद्वारे अधिकार गाजविणार हे अजून स्पष्ट झाले नाही.
मागील विधानसभा निवडणुकीत रायबरेली येथे काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. खुद्द सोनियांच्या मतदारसंघात काँग्रेसची ही अवस्था झाल्यानंतर प्रियांकांनी येथील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
गेली दीड वर्षे प्रियांका रायबरेलीतील काँग्रेस संघटना आणि दैनंदिन प्रश्नांवर लक्ष ठेवून आहेत. पराभवाची कारणमीमांसा करून त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लावले आहे. प्रियांकांच्या या कामगिरीमुळे त्यांना जिल्हा दक्षता आणि निरीक्षण समितीमध्ये सोनियांच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रायबरेलीतून निवडणूक लढण्यासाठीचा तो एक टप्पा मानला जात आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत:चे नेतृत्व गुण दाखविण्यात करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने नरेंद्र मोदींसारख्या खमक्या नेत्याला केंद्रस्थानी आणले आहे. अशा परिस्थितीत प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो. युवा वर्गात प्रियांकाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. लोक प्रियांकामध्ये इंदिरा गांधी यांना बघतात. उत्तर प्रदेशपुरता का होईना काँग्रेससाठी ही जमेची बाजू ठरू शकते, असे राजकीय पंडितांना वाटते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.