www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अखेर, लोकसभेनंतर राज्यसभेतही गोंधळातच तेलंगणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. उच्च सदनात मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. राष्ट्रपतींच्या हस्ताक्षरानंतर तेलंगणा देशातील २९ वं राज्य म्हणून अस्तित्वात येईल. टीएमसीनं या विधेयकावर मतदानादरम्यान वाकआऊट केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनंही मतदानादरम्यान वाकआऊट केलंय.
राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.
या गोंधळात काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना संरक्षण देण्यासाठी कडे केले. यावेळी गृहमंत्र्यांवर फाडलेले कागद तेलंगणा विरोधकांनी भिरकावले. विरोधकांनी कितीही गोंधळ आणि विरोध केला तरी हे विधेयक राज्यसभेची मालमत्ता असल्याचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी सांगत मंजूर केले जाईल, असे स्पष्ट केले.
तेलंगणा मुद्द्यावर अध्यक्ष अन्सारी यांनी सर्वदलीय पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीत भाजपने तेलंगण विधेयकावर चर्चेची मागणी केली. दुसरीकडे, संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच समाजवादी पार्टी आणि अन्नाद्रमुकच्या सदस्यांनी संयुक्त जनता दलाच्या खासदारांसह अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन बिहार राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.
गोंधळ झाला असतानाच तेलगु देसम पार्टीच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशचे दोन भागात विभाजन करण्याला विरोध करुन गोंधळ घातला. या प्रचंड गोंधळामुळे यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष हमिद अन्सारी यांनी सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत आणि पुन्हा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पून्हा तीन आणि तेलंगण विधेयक सादर केल्यानंतर गदारोळ झाला आणि अखेर गोंधळाच्या वातावरणातच तेलंगणा विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी मिळाली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.