'कॉमन मॅन'नंतर 'कॉमन वुमन' घेणार सामान्यांच्या मनाचा ताबा?

ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'ला कोण ओळखत नाही? आता लवकरच 'कॉमन वुमन' हे कार्टून कॅरेक्टरदेखील पाहायला मिळणार आहे? आणि या कॉमन वुमनची जन्मदात्री आहे रिमानिका लक्ष्मण... आर के लक्ष्मण यांची ही नात... 

Updated: May 9, 2017, 09:20 PM IST
'कॉमन मॅन'नंतर 'कॉमन वुमन' घेणार सामान्यांच्या मनाचा ताबा? title=

मुंबई : ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'ला कोण ओळखत नाही? आता लवकरच 'कॉमन वुमन' हे कार्टून कॅरेक्टरदेखील पाहायला मिळणार आहे? आणि या कॉमन वुमनची जन्मदात्री आहे रिमानिका लक्ष्मण... आर के लक्ष्मण यांची ही नात... 

आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या कुंचल्यातून जिवंत केलेल्या कार्टुन्सनं तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ आपल्या हृदयावर राज्य केलं. धोतर आणि जॅकेट घातलेला आर के यांचा कॉमन मॅन देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या भाव-भावनांचं प्रतिक बनला... हा 'कॉमन मॅन' एवढा प्रसिद्ध होता की, लोक बातम्या वाचण्याआधी व्यंगचित्र पाहायचे... आर. के. लक्ष्मण यांचा हाच गौरवशाही वारसा पुढं नेण्याचा विडा आता उचललाय तो त्यांच्या नातीनं... रिमानिका लक्ष्मण यांनी... 

रिमनिका यांनी जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्तानं रिमानिकानं नवं कार्टून कॅरेक्टर जन्माला घातलंय... त्या कॅरेक्टरचं नाव आहे 'कॉमन वुमन'... 'कॉमन वुमन' नावाच्या या कार्टून कॅरेक्टरची होर्डिंग्ज सध्या मुंबईत ठिकठिकाणी लागलीत. आर. के. लक्ष्मण एका कुंडीतल्या झाडाला पाणी घालतायत आणि त्यातून 'कॉमन वुमन' आकाराला येतेय, असं त्यात दाखवण्यात आलंय. ही कॉमन वुमन देखील लोकांना आवडतेय...

महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संघर्ष चितारण्याचा प्रयत्न या माध्यमातून रिमानिका लक्ष्मण यांनी केलाय... १९५१ पासून आर. के. लक्ष्मण यांनी कॉमन मॅन रेखाटायला सुरूवात केली. २०१५ मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांचा हा 'कॉमन मॅन' अमर झालाय. मुंबई, पुण्यात या कॉमन मॅनचे पुतळेही उभारण्यात आलेत. आता त्याच लोकप्रियतेची उंची कॉमन वुमनलाही गाठता येईल का? हे लवकरच कळेल...