नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
नवी दिल्लीचे रहिवासी असलेले आर. के. बन्सल हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांची बॅग एका उंदराच्या भक्ष्यस्थानी सापडली. या बॅगेला उंदरानं कुरतडल्यामुळे बन्सल यांच्या बॅगेचं नुकसान झालं. यावर, बन्सल यांनी थेट ग्राहक न्यायालयाचं दार ठोठावलं.
रेल्वेच्या डब्बांची साफ सफाई करणं, हे रेल्वे प्रशासनाचं काम आहे... पण, रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशासमस्या निर्माण होतात' असं बन्सल यांचं म्हणणं होतं.
यावर, ग्राहक न्यायालायचे अध्यक्ष सी. के. चतुर्वेदी यांनी रेल्वेनं बन्सल यांना 15,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिलेत.
बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर 2013 रोजी ते नवी दिल्लीहून एर्नाकुलमला जात असताना एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. उंदरानं बॅग कुरतडल्यामुळे त्यांच्या बॅगेतल्या कपड्यांचंही नुकसान झालं. यासाठी बन्सल यांनी 18,000 रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. यावर, ग्राहक न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.