टाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 27, 2012, 04:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.
मिस्त्री यांच्यासाठी ही बाब जेवढी प्रतिष्ठेची आणि अभिमानाची आहे, तितकीच ती आव्हानात्मकही आहे. सद्यस्थितीत त्यांना अनेक आघाड्यांवर लढावं लागेल आणि नुसतं लढून पुरणार नाही, तर विजयीही होऊन दाखवावं लागेल. टाटा ग्रुपचा उत्तराधिकारी आणि प्रमुखपदी सायरस मिस्त्री यांच्याच नावाला रतन टाटा यांची पहिली पसंती होती. आता खरं आव्हान असणार आहे ते सायरस मिस्त्री यांच्यासमोर. स्वतः रतन टाटा, टाटा ग्रुप, अर्थविश्व आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

समूहाची फ्लॅगशिप कंपनी असलेल्या टाटा स्टीलवर आजमितीस ५० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. कोरस खरेदीच्या सौद्यानुसार २०१५ पासून डेब्ट रिफायनान्सिंगचं ओझंही कंपनीला वाहवं लागणार आहे. टाटा स्टीलच्या युरोपमधल्या बॉण्ड्सना रेटिंग एजन्सीनं जंक कॅटगरीत टाकलंय. समूहातली आणखी एक दिग्गज कंपनी असलेल्या टाटा मोटर्सवरही सध्या ३८ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
जागतिक मंदीच्या विळख्यात व्यावसायिक गाड्यांचे व्यवहार मंदावलेत. महागड्या कर्जांमुळे पॅसेंजर गाड्यांचीही मागणीही कमी आहे. रतट टाटा यांचं ब्रेनचाईल्ड असलेली टाटा नॅनोही फार प्रभाव पाडू शकलेली नाही. ग्रुपमधली आणखी एक कंपनी टाटा पॉवरवरही ३२हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. वीजेच्या किमती ठरवण्यासाठी प्राधिकरण आणि कोळशांच्या किमतीतील चढउतार पाहता, तिथंही फायदा कमावणं कठीण आहे.

न्यू इकॉनॉमी सेक्टरमधल्या टाटा टेलिसर्व्हिसेस ४५०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. ग्रुपची हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्सचा धंदाही मंदावलेला आहे. ही कंपनीही ३२कोटी रुपयांच्या कर्जाखाली आहे. टाटा ग्लोबल ब्रेव्हरेज या कंपनीवर सुमारे ९०० कोटी रुपयांचं कर्ज आहे. शिवाय या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. टाटा ग्रुपमध्ये सध्या चांगलं काम करणा-या कंपन्यात टीसीएस म्हणजेच टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस ही एकमेव कंपनी आहे. मात्र या कंपनीसमोरही अमेरिका आणि युरोप या दोन्ही मोठ्या बाजारपेठांतील अडचणी कायम आहेत.
ग्रुपच्या लहानमोठ्या सर्वच कंपन्यांसमोर आव्हान आहेत. ग्रुपमधील ९५ टक्के विक्रीही फक्त १४ कंपन्यांतून होतेय. म्हणजेच विक्रीचा मोठा हिस्सा हा केवळ काही कंपन्यांपुरताच मर्यादित आहे. ग्रुपच्या सर्व ५८ अब्ज डॉलर्स ठेवींवर केवळ १० टक्के पोस्ट टॅक्स मिळतोय. हे वाढवणं, हे सायरस मिस्त्री यांना अवघड जाईल, असं दिसतय.