www.24taas.com, मुंबई
लवकरच तुमच्या डेबिट कार्डावरही तुमचा फोटो दिसण्याची शक्यता आहे. बँकांकडून फोटोसह डेबिट कार्ड उपलब्ध झाल्यास अशा कार्डांचा गैरवापर टाळता येईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वाटतंय. त्यामुळेच यासंबंधी आरबीआयनं सर्व बँकांकडून सूचना मागवल्यात.
कार्डधारकाच्या फोटोसह डेबिट कार्ड देता येईल का? अशी विचारणा आरबीआनं बँकांकडं केलीय. डेबिट कार्डसंदर्भात आरबीआयने बँकांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार बँकेच्या नियंत्रणाखालील प्रणालीतील बिघाडामुळे कार्डधारकाचे नुकसान झाल्यास त्यासाठी संबंधित बँक जबाबदार राहील. डेबिट कार्डाच्या सुरक्षेबाबत बँकांनी कसलीही तडजोड करून नये, असे आरबीआयनं म्हटलं आहे. कार्डाच्या सुरक्षिततेपोटी ग्राहकांचं नुकसान झाल्यास त्यास ती बँक जबाबदार राहील.
तसंच कार्डाची चोरी झाल्यास किंवा हरवल्यास किंवा डुप्लिकेट कार्ड सापडल्यास याबद्दलची माहिती त्या ग्राहकाला तत्काळ मिळावी, अशी सुविधा बँकांनी पुरवायला हवी... आणि तशी तक्रार येताच पुढील नुकसान टाळण्यासाठी बँकांनी तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारींचा निपटारा होण्यासाठीची सक्षम यंत्रणा बँकाकडे असावी, असं आरबीआयनं म्हटलंय.