धक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं

बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं. 

PTI | Updated: Sep 9, 2014, 10:43 AM IST
धक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं
प्रातिनिधिक फोटो

दरभंगा: बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिची सुटका केली, तेव्हा ती जीर्ण, फाटके कपडे, अस्ताव्यस्त केस, वाढलेली नखे अशा अवतारात होती. इतका काळ एकाच छोट्याश्या खोलीत, अंधुकशा प्रकाशात राहिल्यामुळं बाहेर आल्यावर तिला धड डोळेही उघडता येत नव्हते, असं पोलिसांनी सांगितलं. 

पीडित महिलेच्या जबाबानुसार दरभंगा इथल्या रामबाग परिसरात राहणाऱ्या या पीडित महिलेचं चार वर्षांपूर्वी (२०१०)  प्रभात कुमार सिंग याच्याशी लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर थोड्याच दिवसांनी तिचा पती आणि सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. पण त्यानंतरही हुंडा  न मिळाल्यानं त्यांनी तिला आणखी त्रास देण्यास सुरूवात केली आणि तिनं एका मुलीला जन्म दिल्यावर तिची अवस्था आणखीनच बिकट झाली. 

तिला कधीही तिचे आई-वडील किंवा इतर नातेवाईकांना भेटू दिलं जात नसे, तसंच कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी बोलण्याचीही तिला परवानगी नव्हती. तिला एका बाथरूममध्ये कैद करण्यात आलं, जिथं पुरेसा प्रकाशही नव्हता. सासरचे लोक तिला उरलंसुरलं अन्न खायला घालत, तिच्या ३ वर्षांच्या मुलीलाही तिच्यापासून दूर ठेवलं जात असे. 

पीडित महिलेच्या वडीलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी त्या महिलेची इतक्या वर्षांच्या जाचातून सुटका झाली. 
पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती आणि सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.