www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मौन सोडून अखेर विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. "देशातील जनतेने माझे काम पाहून मूल्यमापन करावे,` असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलंय.
काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी "स्मृती इराणी साध्या पदवीधरदेखील नाहीत` असं "ट्वीट` केलं होतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालंय.
"माझे कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी बाह्य घटक जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण करत आहेत,` असंही इराणी यांनी सांगितलंय. दरम्यान माकन यांच्या ट्वीटमुळे कॉंग्रेस नेत्यांमध्येच दोन गट पडले होते. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी माकन यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
आज कॉंग्रेसने स्मृती इराणी यांनी 2004, 2011 आणि 2014 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतील विरोधाभास निदर्शनास आणून दिला. 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपण दिल्ली विद्यापीठातून "बी. ए.`ची पदवी घेतल्याचा दावा केला आहे.
2011 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना इराणी यांनी स्वत:ची शैक्षणिक पात्रता बी. कॉम, प्रथम वर्ष अशी नोंदविली आहे. हाच दावा स्मृती इराणी यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला होता.
काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या मते, दोन्ही पदव्यांचे शिक्षण पूर्ण केलेले नाही हे स्पष्ट होतं. स्मृती इराणी यांचा शिक्षणविषयक कोणता दावा खरा आहे, हे सांगणे अवघड असल्याचे सिंघवी यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.