कोलकाता : देशातील असहिष्णुता आणि धर्मांधता या विषयावर बोलताना जावेद अख्तर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे ते अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.
काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांसारखं वागत आहेत. यापद्धतीच्या तत्त्वांना वगळलं तर भारतीय समाज नेहमीच सहिष्णुच राहिलाय, असं गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी म्हटलंय. ते कोलकत्यात झालेल्या एका साहित्यिक कार्यक्रमात बोलत होते.
१९७५ मध्ये मी माझ्या एका चित्रपटात मंदिरातील विनोद दृश्य दाखवले होते. पण, मी आज असं करणार नाही. त्या काळात मी असं दृश्यं मस्जिदमध्ये चित्रीत करू शकलो नसतो, कारण तिथं असहिष्णुता होती. आता मात्र काही हिंदू समूह मुस्लिम कट्टरवाद्यांसारखं वागत आहेत, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय.
पण, हे वागणं म्हणजे सगळे हिंदू असं वागतात असं नाही... हे केवळ काही हिंदू समूह आहेत. समाजातील असहिष्णुता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे काही लोक मानत आहेत. मला यावर विश्वास नाही. देशात कुठलीही असहिष्णुता नाही, असंही काही जणांचं म्हणणं आहे. मला यावरही विश्वास नाही... तर सध्या देशात या दोघांमधली स्थिती आहे, असं त्यांनी म्हटलंय.