www.24taas.com, गांधीनगर
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आज सोनिया गांधींनी रणशिंग फुंकले. मोदींनी केलेल्या आरोपांना सोनिया काय उत्तर देतात याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं असताना सोनियांनी मात्र मोदींचा उल्लेख सोईस्कररीत्या टाळला. मात्र मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी आक्रमकतेनं हल्ला चढवला......
नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर परदेश प्रवास खर्चाबाबत सणसणीत आरोप केले आणि सर्वांचं लक्ष लागलं ते सोनियांच्या राजकोटच्या सभेकडं. सोनिया गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर मोदींच्या आरोपांना त्या जोरदार उत्तर देतील असं वाटत होतं. त्यांनी संपूर्ण सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला मात्र आरोपांबाबत मौन राखत मोदींच्या नावाचा उल्लेख मोठ्या खुबीनं टाळला. या सभेत त्यांनी गुजरातचा विकास झाल्याचं मान्य केलं. मात्र विकासाचा पाया काँग्रेसनंच रचल्याचा दावा करत, विकासाचं श्रेय सामान्य जनतेला दिलं...
सोनियांनी मोदींचा उल्लेख टाळला असला तरी त्यांच्या सरकारच्या धोरणांवर मात्र सवाल उपस्थित केले. सौराष्ट्रात शेतक-यांची अवस्था बिकट असूनही गेल्या वर्षांत सरदार सरोवरचे पाणी सौराष्ट्रात का पोहचले नाही? देशात सर्वात जास्त व्हॅट गुजरातमध्ये आहे तो का कमी केला जात नाही? काँग्रेसशासित राज्यांमध्ये 9 सिलिंडर्सना अनुदान दिले जाणार आहे गुजरात याबाबतचा निर्णय का घेत नाही?, गुजरातमध्ये महिला का सुरक्षित नाहीत? भाजपमुळेच लोकपाल बिल राज्यसभेत रखडले असा घणाघाती आरोप पहिल्याच प्रचारसभेत सोनियांनी मोदी सरकारवर केलाय. पहिल्या प्रचारसभेत सोनियांनी थेट मोदींवर हल्ला केला नसला तरी गुजरात विधानसभा निवडणुकीचा सामना सोनिया विरूद्ध मोदी असाच रंगणार असल्याचं दिसतंय.