नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर भूसंपादनाच्या मुद्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. सरकारच्या या धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष कायम लढेल. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देऊन, सरकार त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी मंत्री ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांचा आवाज कधी दबलेला नाही आणि न यापुढे कधी दबेल, असे म्हणत सोनियांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
सोनिया गांधी म्हणाल्या,"शेतकरी व त्यांचे कुटुंब दिवसरात्र शेतात राबत असूनही, वेळातवेळ काढून याठिकाणी आल्याबद्दल सर्वांचे आभार. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी येथे एकवटल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. शेतकऱ्यांविरोधात सरकार षडयंत्र रचत असून, शेतकऱ्यांविरोधात कायदे करत आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासने खोटी आहेत.
औद्योगिक कॉरिडोरसाठी जवळपासची एक किलोमीटरपर्यंतची जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे उद्योगपतींसाठी आहे. शेतकऱ्यांमुळे जगात भारताचे स्थान उच्च आहे. भारताला शेतकऱ्यांनी मजबूती दिली आहे. कापूस, गहू आणि अन्य शेतकरी उत्पादनांच्या किंमतीत दिवसेंदिवस घटत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.