सुनंदा 'हत्या' प्रकरणात मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यता

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची एसआयटी टीम पाकिस्तान पत्रकार मेहर तरार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 12, 2015, 04:45 PM IST
सुनंदा 'हत्या' प्रकरणात मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यता title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची एसआयटी टीम पाकिस्तान पत्रकार मेहर तरार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. जस्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहर यांना चौकशीसाठी कोणत्याही प्रकारची नोटीस धाडण्यात आलेली नाही. परंतु, गरज पडल्यास दिल्ली पोलिसांची विशेष चौकशी समिती (एसआयटी) त्यांची चौकशी करू शकते. 

सुनंदा पुष्कर यांचे पती शशी शरूर आणि मेहर तरार यांच्यात जवळीक असल्याचं समोर आलं होतं. यावरूनच, सुनंदा आणि मेहर यांचा सोशल वेबसाईट ट्विटरवर वादही झाला होता. 

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना चौकशीत सहयोग करणार असल्याचं मेहर तरार यांनी झी न्यूजशी बोलताना म्हटलंय. या प्रकरणात याधीच एसआयटीनं सुनंदा यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची अनेकदा चौकशी केलीय. 

एसआयटीच्या पाच सदस्यीय टीमनं थरुर यांचा घरगुती नोकर बजरंगी आणि नारायण सिंह, थरुर दाम्पत्याचे मित्र संजय दीवान, गंगाराम हॉस्पीटलचे हृदयरोग विशेषज्ज्ञ डॉ. रजत मोहन तसंच पीए प्रवीण कुमार यांचीही चौकशी केलीय. 

१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ५२ वर्षीय सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. गेल्याच महिन्यात पोलिसांनी आपल्या चौकशीदरम्यान या प्रकरणाची नोंद 'हत्या' म्हणून केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.