गरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल!

 भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत. 

Updated: Oct 30, 2015, 10:13 AM IST
गरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल! title=

नवी दिल्ली : भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत. 

राजा मस्वाती यांचं हे सगळं कुटुंब दिल्लीतील एका हॉटेलमध्ये उतरलंय. त्यांच्यासाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 200 रुम्स बुक करण्यात आल्यात. विशेष म्हणजे, राजा मस्वाती यांच्या एका रुमचं दिवसाचं भाडं जवळपास दीड लाख रुपये आहे... तसंच इतर रुमचं दिवसाचं भाड जवळपास 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत आहे. स्वाझीलँन्डकडून हे हॉटेल सहा दिवसांपूर्वीच बुक करण्यात आलेत.  

कोण आहेत मस्वाती
मस्वाती हे  स्वाझीलँन्डचे सध्याचे राजे आहेत. 1968 साली आपल्या देशाला मस्वाती यांच्या पित्यानं सोभुजा द्वितीय यांनी इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं.  सोभुजा यांच्या 125 राण्या होत्या. 

मस्वाती यांच्या 15 राण्या
मस्वाती यांच्या 15 राण्यांपैंकी केवळ दोन राण्यांना रॉयल दर्जा प्राप्त आहे. त्यांनी 2013 साली एका 18 वर्षांच्या मुलीसोबत 15 वा विवाह केलाय. 47 वर्षीय मस्वाती यांनी आपल्या राण्यांसाठी 13 आलिशान महल बनवलेत. 

धनाढ्य राजा
2009 साली प्रकाशित झालेल्या 'फोर्ब्स'नुसार मस्वाती हे जगातील सगळ्यात धनाढ्य राजांपैंकी एक राजा म्हणून ओळखले जातात. यावेळी त्यांची संपत्ती 200 मिलियन डॉलर इतकी होती. त्यांच्याकडे पाच लाख डॉलर्सच्या मॅबेच कारसहित इतर 62 लक्झरी गाड्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सामान्यांना या गाडीचे फोटो काढायलादेखील परवानगी नाही.

गरीब प्रजा
 स्वाझीलँन्ड हा एक गरीब देश म्हणून ओळखला जातो. या देशाची एकूण लोकसंख्या जवळपास 1 करोड 20 लाखांच्या आसपास आहे. 69 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली येतात. जवळपास 63 टक्के लोक दररोज 80 रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह भागवते. या देशाचा बेरोजगारी दर 40 टक्के आहे. धक्कादायक म्हणजे,  स्वाझीलँन्डमध्ये जवळपास 40 टक्के लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.