नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.
तोमर यांनी आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे, तर आम आदमी पक्षाने तोमर यांना अटक होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांना अटक केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तत्कालीन कायदामंत्री तोमर चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीतील हौजखास पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोमर यांच्या राजीनाम्याची भाजप आणि काँग्रेसकडून एप्रिल महिन्यापासून मागणी करण्यात येत होती. बिहारच्या एका विद्यापिठाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, ‘तोमर यांचे प्रमाणपत्र हे खरे नसून तसा कोणता पुरावाही विद्यापीठात उपलब्ध नाही. तेव्हापासून तोमर यांच्यावर टीका करण्यात येत होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.