नवी दिल्ली: दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सकाळी १० वाजता त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आपच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केलाय. दिल्लीतली राजकीय स्पर्धा त्यामुळं अधिक तीव्र झालीय.
दिल्लीत मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल या वादाचा पुढचा अंक आता सुरू झालाय. दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक झालीय. तोमर यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेलं पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप तोमर यांच्यावर आहे. मात्र एका मंत्र्याला अचानक अशा प्रकारे झालेल्या अटकेमुळं आपचे नेते संतापलेत.
या अटकेनंतर काँग्रेसनं 'आप'ला नैतिकतेचा आरसा दाखवत राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय.
या अटकेपूर्वी राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीच्या अँटी करप्शन ब्युरोमध्ये जॉईंट कमिश्नर नावानं नवं पद निर्माण करून त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याला रुजू होण्याचे आदेश दिलेत. मात्र एसीबीमध्ये असं पदच नसल्यामुळं ही नियुक्तीच होऊ न देण्याचा पवित्रा आपनं घेतलाय.
दिल्लीच्या राजकारणात प्रत्येकजण एकमेकांवर राजकीय स्कोअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच नाट्याचा पुढचा भाग म्हणून या अटकेकडं पाहिलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.