www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये लष्काराचं रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झालंय. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही तिथंच फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाला करायचंय.
दरम्यान, केदारनाथच्या खोऱ्यात रोगराई पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात बळावलाय. साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे सडलेल्या मृतदेहांवर घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यातही सतत पाऊस कोसळत असल्यानं या कार्यातही अडथळे येत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे डीएनए जपून ठेवण्यात येत आहेत.
आरोग्य विभागानं नदीचं पाणी दूषित झाल्याची चेतावणी इथल्या नागरिकांना दिलीय. कुणीही हे पाणी पिऊ नये अशी सूचना सातत्याने केली जातेय. केदारनाथ मंदिरच्या आसपासच्या भागातही गाळात फसलेल्या आणि सडलेल्या मृतदेहांमधून दुर्गंधी पसरलीय.
बचावदल अजूनही ज्या भागात पोहचू शकलेलं नाही अशा भागांत आणखी काही सडलेले मृतदेह आढळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०८ जणांना हर्सिल सेक्टर भागातून बाहेर काढण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.