www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डेबिट कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर तुमच्याच खात्यातील पैसे तुमच्या परवानगीशिवाय शॉपिंगवर उडवण्याच्या घटना काही नवीन नाहीत. पण, आता या गोष्टींना मात्र आळा बसणार आहे. कारण, आजपासून तुम्हाला डेबिट कार्डाच्या साहाय्याने शॉपिंग करतानाही तुमचा पिनकोड द्यावा लागणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार आजपासून `डेबिट कार्ड` धारकांना आपल्या `डेबिट कार्ड`नं खरेदी करताना आपल्या `एटीएम कार्ड`चा चार अंकी पिनकोड नमूद करावा लागणार आहे. त्याशिवाय त्या कार्डमधून खरेदी केली जाऊ शकत नाही किंवा दुसरे कोणी त्या डेबिट कार्डचा पिनकोड माहित असल्याशिवाय खरेदी करु शकणार नाही.
याअगोदर डेबिट कार्डाच्या साहाय्यानं खरेदी करताना ते केवळ स्वॅप करणं पुरेसं होतं... आणि तुमच्या अकाऊंटमधून पैसे वजा व्हायचे. त्यामुळे त्याचा अनेकदा गैरवापर झाल्याच्या घटनाही उघडकीस आल्या होत्या. पण, या सुविधेमुळे बँक खातेधारकांना अधिक सुरक्षा मिळू शकेल.
हो, पण... ही सुरक्षा तुम्हाला लाभदायक ठरण्यासाठी एक गोष्ट करणं महत्त्वाचं ठरणार आहे... ते म्हणजे, दुकानदाराकडून पिनकोड सांगितल्यानंतर त्याच्याकडून तुमचं डेबिट कार्ड परत घेणं... आणि मग निश्चिंत वापरा तुमचं डेबिट कार्ड...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.