रजनीकांत देणार मोदींना पाठिंबा? करणार भाजपात प्रवेश?

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हा त्याच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाही. अशा रजनीकांतने जर नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला, तर भाजपला दक्षिणेत बहुमत मिळू शकेल. त्यामुळे भाजप सध्या रजनीकांतचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2013, 06:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर हरियाणामध्ये नरेंद्र मोदींनी प्रचाराचं नवं रणशिंग फुंकलं. नवरात्रीनंतर उत्तर प्रदेशातही मोदी प्रचार करणार आहेत. त्याचसोबत दक्षिणेत भाजपचा प्रभाव वाढावा यासाठी भाजपने चक्क रजनीकांतला गळ घातली आहे.
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हा त्याच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाही. अशा रजनीकांतने जर नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला, तर भाजपला दक्षिणेत बहुमत मिळू शकेल. त्यामुळे भाजप सध्या रजनीकांतचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी निवडणुकीत रजनीकांतने नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करावा, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली आहे. मात्र दक्षिणेतील ज्येष्ठ भाजप नेते एल. गणेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून अधिकृतपणे रजनीकांतला आमंत्रित केलेलं नाही.
रजनीकांतने भाजपमध्ये प्रवेश केल्यास भाजपला चांगलाच फायदा होऊ शकतो. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पॉन राधाकृष्णन म्हणाले, “रजनीकांत हा तामिळनाडूतील अत्यंत महत्वाचा, जबाबदार आणि सन्माननीय व्यक्ती आहे. त्याला देशाबद्दल काळजी आहे आणि तामिळनाडूच्या हितासाठीही तो प्रयत्न करतो. त्याने जरूर राजकीय निर्णय घेत भाजपला पाठिंबा द्यावा.”
रजनीकांतचा चाहतावर्ग दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर आहे. रजनीकांत हा तामिळनाडूतच नव्हे तर जगभरात आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. रजनीकांतने अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल राज्य सरकारकडे आवाज उठवला होता. मात्र त्याने स्वतः कधीही राजकारणात पाऊल ठेवलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.