भोपाळ : असहिष्णुतेच्या मुद्दा आणि त्याबद्दल बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं केलेलं एक वक्तव्य एखादं घरं उद्ध्वस्त करू शकतं, अशी कल्पनाही कुणी केली नसेल... पण, दुर्दैवानं असं घडलंय!
मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेनं आमिर खानच्या वक्तव्यावरून आपल्या पतीशी झालेल्या भांडणानंतर आपलं जीवन संपवलंय. जबलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
लहरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अयंक पांडे आणि त्यांची पत्नी सोनल पांडे यांच्यात घरामध्ये निवांत क्षणी आमिरनं असहिष्णुतेबद्दलच्या केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू होता... हा वाद कधी विसंवादात बदलला हे त्यांच्याही लक्षात आले नाही... आणि या वादानंतर पत्नी सोनलनं विष खाऊन या वादाचा शेवट केला, असं अयंकनं पोलिसांना सांगितलं.
पतीशी वाद झाल्यानंतर सोनल दुसऱ्या रुममध्ये गेली आणि तिनं विष खाल्लं... त्यानंतर तिला उलट्या सुरू झाल्या. त्यानं सोनलला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथंच सोनलचा शेवट झाला. पोलिसांनी सोनलचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलाय.
आमिर खाननं देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल बोलताना पत्नी किरण राव हिनं चिंता व्यक्त करत भारत सोडून दुसरीकडे राहायला जायची इच्छाही एकदा व्यक्त केली होती, असं म्हटलं होतं. यावरून देशात अनेकांनी आमिरवर टीकाही केली आणि अनेकांनी त्याची पाठराखणही केलेली दिसली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.